झरीकर फुड्सवर छापा, ६ लाख ९४ हजारांचा निकृष्ट दर्जाचा हळद आणि धने पावडर जप्त...परभणीत FDA ची धडक कारवाई
झरीकर फुड्सवर छापा, ६ लाख ९४ हजारांचा निकृष्ट दर्जाचा हळद आणि धने पावडर जप्त...परभणीत FDA ची धडक कारवाई
परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- अन्न व औषध प्रशासन (FDA) परभणी कार्यालयाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी एका मोठ्या कारवाईत परभणी तालुक्यातील झरी येथील 'मे. झरीकर फुड्स प्रायव्हेट लिमिटेड' या पेढीवर धाड टाकली आहे. या तपासणीत निकृष्ट दर्जाचा संशय, अस्वच्छ साठवणूक आणि चुकीचे लेबलिंग आढळल्याने तब्बल ६ लाख ९४ हजार ९२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी झरीकर फुड्सच्या कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या साठवणुकीत मोठी अनियमितता आणि अस्वच्छता दिसून आली. तसेच उत्पादनांवर चुकीचे लेबलिंग आणि माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय आल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करत अन्नसाठा जप्त केला. हळकुंड : ५९८ किलो, किंमत रु. १,७९,४००, धने पावडर : १४४० किलो (२८८० पाकिटे), किंमत रु. ५,१५,५२० एकूण रु. ६,९४,९२०/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यातून नियमानुसार अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे आणि. कृष्णा मुळे यांनी, सहायक आयुक्त (अन्न) परभणी येथील अनंत ई. चौधरी आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह-आयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


Comments
Post a Comment