परभणी एमआयडीसी मधील शिवम मसाल्याच्या फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका

मोठी बातमी! परभणी एमआयडीसी मधील शिवम मसाल्याच्या फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाचा दणका; सणासुदीच्या तोंडावर तब्बल २१ लाखांहून अधिकचा निकृष्ट दर्जाचा मसाला जप्त!

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) :सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या 'सुरक्षित अन्न- निरोगी महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. परभणीच्या MIDC परिसरातील 'मे. शिवम फूड टेक' या मसाला उत्पादक कारखान्यावर धाड टाकून प्रशासनाने तब्बल २१ लाख ७४ हजार ५५० रुपये किमतीचा अयोग्य, संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. सणासुदीच्या दिवसांत फसवणूक करत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आस्थापनेचा पर्दाफाश झाल्याने परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी FDA च्या पथकाने अचानक केलेल्या या तपासणीत अन्नसुरक्षेच्या निकषांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे दिसून आले. 

कारखान्यात मसाल्यांची अयोग्य व अनियंत्रित साठवणूक केली जात होती, तसेच उत्पादनांवर त्रुटिपूर्ण लेबलिंग आढळून आले. अन्नसुरक्षेच्या निकषांचे थेट उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कठोर जप्तीची कारवाई करत हळद पावडर : ५,९९८ किग्रॅ (किंमत अंदाजे ₹ १७,९९,४००/-) मिरची पावडर: १,१९८ किग्रॅ / २,८८० पॅकेट्स (किंमत अंदाजे ₹ ३,५९,४००/-) चटपट मसाला : ३५ किग्रॅ (किंमत अंदाजे ₹ १५,७५०/-) असा एकूण २१७४५५०/-  रूपये मूल्य असलेला साठा जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या सर्व संशयित हळद मिरची पावडर चटपट मसाला अन्नपदार्थांचे अधिकृत नमुने तातडीने गोळा करून विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे आणि  मुळे यांच्या पथकाने, सहायक आयुक्त (अन्न) अनंत चौधरी आणि सह आयुक्त (अन्न) छ. संभाजी नगर विभाग श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. एकंदरीत परभणी येथील अन्न व औषधी प्रशासन विभाग दोन अधिकाऱ्यांच्या बळावर अतिशय छान कामगिरी करत ठीक ठिकाणी छापेमारी करत आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली