बंधपत्रा कामी पोलीस हवालदार वसीम शेखने लावला 5000 रुपयांचा मागणीचा घाट....एसिबी ने लावली त्याची रंगेहाथ पकडुन वाट...!

बंधपत्रा कामी पोलीस हवालदार वसीम शेखने लावला 5000 रुपयांचा मागणीचा घाट....एसिबी ने लावली त्याची रंगेहाथ पकडुन वाट...

जिंतूर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार वसीम शेख रंगेहात अटक

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- शेतजमिनीच्या वादातील गुन्ह्यात जामिनानंतरच्या बंधपत्राच्या पुढील कार्यवाहीसाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख वसीम शेख हारून यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही यशस्वी सापळा कारवाई सोमवारी (दि. २१) परभणी शहरातील बी. रघुनाथ हॉलजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की; तक्रारदार (वय ६८ वर्ष, व्यवसाय: शेती) यांच्याविरोधात शेतजमिनीच्या वादावरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना परभणी जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तक्रारदार यांनी बोरी पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार पोलीस हवालदार वसीम शेख यांची भेट घेतली. त्यावेळी वसीम शेख यांनी बंधपत्राच्या कार्यवाहीसाठी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे १६ सप्टेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष बोरी पोलीस ठाण्यात पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी पोलीस हवालदार वसीम शेख यांनी मोबाईलवर '१०,०००' हा आकडा टाईप करून दाखवत १० हजार रुपयांची लाच मागितली. शेवटी तडजोडीअंती ५ हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले त्यानुसार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी परभणी शहरातील बी. रघुनाथ हॉलच्या बाजूला असलेल्या भंडारी यांच्या हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी वसीम शेख यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस ठाणे नवा मोंढा, जिल्हा परभणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची कार्यवाही चालू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ACB परभणीचे पोलीस उपअधीक्षक किशोर तरोने, महिला पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर निलपत्रेवार, पोलीस हवालदार नामदेव आदमे, पोलीस अंमलदार नागरगोजे व घुले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त