लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात! पत्रकारांना धमकावणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा; परभणीत तीव्र संताप


लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात! पत्रकारांना धमकावणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा; परभणीत तीव्र संताप

पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना निवेदन; पत्रकार संघटना आक्रमक, राज्यभरातून उमटतायत तीव्र पडसाद

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर लोकप्रतिनिधींकडूनच गदा आणण्याचे धक्कादायक प्रकार वाढीस लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली, तसेच असभ्य भाषेत धमक्या दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे लोकशाहीला काळीमा फासला गेला असून, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी परभणीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर निवेदन पाठवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींचे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे!

​दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले आणि धमक्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर थेट जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनीच पत्रकारांना धमकावल्याने पत्रकार वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "जर जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांनाच लोकप्रतिनिधी अशा प्रकारे धमकावणार असतील, तर ही अत्यंत निंदनीय आणि गंभीर बाब आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी पत्रकारांनी व्यक्त केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी खासदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पत्रकार संघटना एकवटल्या; निवेदनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या

​खासदार संजय दिना पाटील यांच्या या कृत्याविरोधात परभणीतील पत्रकार संघटनांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. या आंदोलनात आणि निवेदनावर पुढील प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत:

  • प्रभू दिपके (अध्यक्ष)
  • राजकुमार हट्टेकर (प्रदेश कार्यकारिणी सदस्य)
  • लक्ष्मण मानोलीकर (कार्याध्यक्ष)
  • मोईन खान (कोषाध्यक्ष)
  • विठ्ठलराव वडकुते (उपाध्यक्ष)
  • रामेश्वर शिंदे (अध्यक्ष, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती)
  • सुधाकर श्रीखंडे (प्रसिध्दी प्रमुख)
  • मंदार कुलकर्णी (जिल्हाध्यक्ष साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटना)

​याशिवाय प्रकाश साळवे, लक्ष्मीकांत बनसोडे, शिवशंकर सोनुने, धाराजी भुसारे, शिवाजी वाकोडे, संघपाल आढागळे, मंदार कुलकर्णी, पांडुरंग अभुरे, अनिल दाभाडकर, अरुण रणखांबे, सुनील सुतारे, दिलीप बोरकर, संजय घनसावंत यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी पत्रकार संघटनांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त