परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त!

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा केवळ 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त!
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतरही परभणीत संथ कारवाया; सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी गांभीर्याने मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी

कारवाई केल्याचे मिडीयाला सांगू नका असे देखील मिळाली माहिती

सोमवारी अन्न व औषधी प्रशासनातील अधिकारी तपासणी करण्यास येणार आहेत अशा एका अफेनेच परभणीतील खिचडी सेंटर बंद ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले , यातून एक चर्चा देखील समोर आली की ह्यांना कसं काय कळाले की तपासणी होणार आहे

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांभाळल्यापासून विभागाला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांच्या पदभार स्वीकारानंतर परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत आत्तापर्यंत १६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या कारवाया केवळ ‘आम्ही काहीतरी करतोय’ हे दाखवण्यापुरत्याच म्हणजेच केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा सूर परभणीकरांमधून उमटत आहे. जिल्ह्यात अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण पाहता, अन्न व औषध प्रशासनाचा धाक पूर्णपणे मोडीत निघाल्याचे चित्र आहे.

दोनच फूड इन्स्पेक्टरच्या भरवशावर कारभाराचे रडगाणे

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची (फूड इन्स्पेक्टर) तीन पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी एक जागा दीर्घकाळापासून रिक्त असून सध्या केवळ दोनच अधिकारी कार्यरत आहेत. "अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवायांवर मर्यादा येतात" असे रडगाणे प्रशासनाकडून गायले जात असले, तरी उपलब्ध दोन अधिकाऱ्यांच्या वतीने ज्या प्रखरतेने आणि गतीने कारवाया होणे अपेक्षित आहे, तशी इच्छाशक्ती मात्र कुठेही दिसून येत नाही. परिणामी, परभणीतील अन्न व औषध विभागाला न जुमानता भेसळ माफिया मात्र कमालीचे बिनधास्त झाले आहेत.

केवळ 'दिखाऊ' कारवाया; मूळ प्रश्न कायम

आतापर्यंत झालेल्या १६ कारवाया या निव्वळ आकडा दाखवण्यापुरत्याच मर्यादित आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सणासुदीच्या काळात किंवा ठराविक दिवसांत थातूरमातूर कारवाया करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला जातो. परंतु, शहरातील आणि ग्रामीण भागातील हॉटेल, किराणा दुकाने, दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते आणि शीतपेयांच्या गोदामांमध्ये सर्रास सुरू असलेल्या भेसळीवर अद्यापही कोणताही ठोस अंकुश लावण्यात या विभागाला यश आलेले नाही.

सहाय्यक आयुक्त चौधरी साहेबांकडून ‘सिंगम’ पॅटर्नची अपेक्षा!

परभणीकरांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकारावर आता अन्न व औषध प्रशासनाचे परभणीचे सहाय्यक आयुक्त चौधरी यांनीच विशेष लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. सहाय्यक आयुक्त चौधरी साहेब यांनी परभणी जिल्ह्यात अतिशय गांभीर्यपूर्वक आणि आक्रमकपणे विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ कागदोपत्री कारवाया न करता, प्रत्यक्ष मैदानात उतरून भेसळ माफियांना चाप लावावा आणि परभणीतील सर्वसामान्य नागरिकांचे भेसळयुक्त अन्नपदार्थांपासून रक्षण करावे, अशी तीव्र अपेक्षा परभणीकर नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा धाक दाखवत सहाय्यक आयुक्त चौधरी परभणीत भेसळखोरांचे कंबरडे मोडणार की ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशीच स्थिती राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न