प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा

 परभणी प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा




परभणी | टिळक रत्न प्रतिनिधी :- परभणी शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात मागील वर्षापर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यरत होते. सध्या आरटीओ कार्यालय असोला येथे स्थलांतरित करण्यात आले असले तरी, आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार मात्र अद्याप प्रशासकीय इमारत परिसरात सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.

आरटीओ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतरही पासिंगसाठी येणारी वाहने एजंटांकडून प्रशासकीय इमारतीच्या मैदानात आणि परिसरातच उभी करण्यात येत आहेत. याठिकाणी एजंटांकडून वाहनांची कागदपत्रे तपासणी व इतर कामेही सुरू असल्याचे दिसून येते. परिणामी, परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत असून संपूर्ण रस्ता अडवला जात आहे.

प्रशासकीय इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये कार्यरत असल्याने दररोज अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र एजंटांनी उभ्या केलेल्या वाहनांमुळे अधिकाऱ्यांच्या वाहनांना आत जाण्यासाठी पुरेशी जागाच राहत नसल्याची तक्रार समोर आली आहे. अनेकदा वाहनांना वळसा घ्यावा लागत असून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे, याबाबत संबंधित एजंटांना विचारणा केल्यास काहीजण अरेरावीची भाषा वापरत असल्याचीही तक्रार अधिकारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या परिसरातच शिस्तभंगाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिक व कर्मचारी वर्गाकडून संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून प्रशासकीय इमारत परिसरातील अनधिकृत पार्किंग हटवावे, आरटीओ संबंधित कामे अधिकृत ठिकाणीच करण्यास सक्ती करावी तसेच नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

📌 प्रशासन कारवाई करणार का?
आरटीओ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतरही जुन्याच ठिकाणी एजंटांची गर्दी वाढत असल्याने प्रशासनाने ठोस कारवाई करून शासकीय परिसराची शिस्त राखणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न