परभणीसह मराठवाड्यासाठी रेल्वे सुविधांचा विस्तार करा :खासदार संजय जाधव
परभणीसह मराठवाड्यासाठी रेल्वे सुविधांचा विस्तार करा :खासदार संजय जाधव
परभणी,दि.18(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी, जालनासह संपूर्ण मराठवाडा विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांचे थांबे, अतिरिक्त डबे, नवीन रेल्वे गाड्या, टर्मिनल व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा विस्तार करावा, अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची गुरुवार 18 डिसेंबर रोजी भेट घेऊन आपल्या मागण्या संदर्भातील एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे, गंगाखेड रेल्वे स्थानकावर धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा द्यावा. कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर तसेच पुणे-अमरावती-पुणे रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त कोच जोडावेत. नांदेड-पुणे व नंदिग्राम एक्सप्रेसला मानवत रोड स्थानकावर दोन्ही दिशांनी थांबा द्यावा, तसेच नांदेड-पुणे एक्सप्रेस पूर्ववत पुणे स्थानकापर्यंत चालवावी. निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजर गाडीत शयनयान व थ्री-टायर एसी डबे जोडून सुरक्षा कर्मचार्यांची पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
तसेच परभणी रेल्वे जंक्शनवर किमान दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारून अतिरिक्त आरपीएफ तैनात करावी, तर धर्माबाद-मनमाड पॅसेंजरला जालना जिल्ह्यातील कोडी स्थानकावर थांबा द्यावा. नगरसोल-नरसापूर गाडीला परतूर स्थानकावर दोन्ही दिशांनी थांबा, तसेच नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेसला जालना स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नांदेड-जोधपूर (जैसलमेरमार्गे) जालना-मनमाड-जळगाव-अहमदाबाद मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरू करावी, पूर्णा-पटना व नांदेड-रायचूर एक्सप्रेस जालना स्थानकापर्यंत वाढवाव्यात. बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेस नागपूरपर्यंत, तर मिरज-परळी पॅसेंजर पूर्णा जंक्शनपर्यंत वाढवावी. नांदेड-गंगानगर एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवावी, तसेच नागपूर-कोल्हापूर व अमरावती-पुणे एक्सप्रेसचा वेग वाढवावा. अमरावती-पुणे एक्सप्रेस पुणे स्थानकावर सकाळी दहा वाजण्यापूर्वी पोहोचेल अशी वेळापत्रकात सुधारणा करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांबाबत परभणी जंक्शनवर नवीन पीटलाईन, पूर्णा जंक्शनवर पीटलाईनचा विस्तार व ई-लोको शेड उभारणी, परभणी-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तसेच परभणी-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशा महत्त्वाच्या मागण्या खासदार जाधव यांनी निवेदनात केल्या आहेत.

Comments
Post a Comment