परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यायचे तर नवीन दर लागू
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांसाठी. 1 सप्टेंबरपासून ठराविक दर लागू
परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाल्याने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक वैशिवि-२०१७/प्र.क्र.१९१/प्रशा-२, दिनांक २० नोव्हेंबर २०१७ नुसार दि. १ सप्टेंबर २०२५ पासुन जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी देण्यासाठी संबंधीत महाविद्यालयाकडे रुग्णालय असणे बंधनकारक आहे. परभणी येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर हे हस्तांतरण झालेले आहे. शासन निर्णयानुसार वैद्यकीय महाविद्यालयाकडे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सुविधांसाठी शासनाने ठराविक दर लागू केले आहेत. त्यानुसार बाहयरुग्ण विभागात तपासाणीसाठी २० रुपये, एक्सरेसाठी ९० रूपये, आंतररुग्ण विभागात नोंदणीसाठी ३० रुपये, सिटीस्कॅन तपासण्या १२५ ते ११०० रुपये, सोनोग्राफीसाठी १२० रुपये, दुसऱ्या बाळांतपणासाठी २०० तर तिसऱ्या बाळांतपणासाठी ४४० रुपये, बाळांतपणाच्या शस्त्रक्रियेसाठी ५५० रुपये, अतिदक्षता विभागात प्रत्येक दिवसासाठी ४०० रुपये, रुग्णवाहीकेकरीता २० रुपये प्रति किलोमीटर असे शुल्क लागणार आहे. दि. 1 सप्टेंबर 2025 पासून हे दर लागू होणार आहेत.
या लाभधारकांसाठी शुल्कातून राहणार सूट - दारिद्रय रेषेखालील सर्व व्यक्ती, अंत्योदय व अन्नपूर्ण योजनेतील लाभार्थी, स्वातंत्र्यसैनिक, बॉम्बस्फोट दुर्घटनाग्रस्त, दहशतवादी हल्ले दुर्घटनाग्रस्त, क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिशिष्कघात, एचआयव्ही बाधित, कुष्ठरोगी, सिकलसेल रुग्ण, मानसिक असमर्थ, हिमोफेलिया, थॅलेसिमिया या आजारांसहीत सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारामुळे स्वतः चरितार्थ चालवू न शकणारे रुग्ण, निराधार, घटस्फोटित परंतु पोटगी न मिळाणाऱ्या महिला, प्रतिवर्षी २१ हजार पेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारीत महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटूंब ज्यांचे वार्षीक उत्पन्न २१ हजारापेक्षा कमी आहे किंवा कुटूंबाचे नाव दारिद्रय रेषेखालील यादीत असलेले, १८ वर्षाखालील अनाथ मुले, सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले लाभार्थी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग तपासणी (ओपीडी) वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत राहील. संध्याकाळी ४.३० ते ५.३० वाजताची बाहयरुग्ण तपासणी (ओपडी) बंद राहील, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद एस. भिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*-*-*-*-*
Comments
Post a Comment