शेतकरी बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणीतील मेळाव्यात आश्वासन
शेतकरी बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणीतील मेळाव्यात आश्वासन
*संकटकाळात शिवसेनेचा १०० टक्के समाजकारणाचा निर्धार*
*कर्ज वसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करण्याची ग्वाही*
*पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेनेचा उपक्रम*
*शेतकऱ्यांच्या मुलांना २५००० सायकल, लाडक्या बहिणींना २५००० शिलाई मशीनचे वाटप करणार*
परभणी, ता. ७ ऑक्टोबर (टिळक रत्न प्रतिनिधी):- दुष्काळाच्या संकटात राज्यातील गोरगरिब शेतकरी आणि लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गांधी पार्क मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संकटकाळात शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करु तसेच चाऱ्याची व्यवस्था करु. संकटात शेतकऱ्यांसाठी शिवसेना १०० टक्के समाजकारण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेना राज्यभरात सेवा से समर्पण ही गौरव यात्रा काढणार आहे. या उपक्रमात शिवसेनेकडून राज्यभरात शेतकऱ्यांच्या मुलांना २५ हजार सायलकींचे वाटप, लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन, शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा, गरजू वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज परभणी जिल्ह्यातून झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना सायकल आणि लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पक्षाकडून २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या मेळाव्याला खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार सईद खान व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज दुष्काळाचे सावट आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहिण संकटात असल्याची आपल्याला जाणीव आहे. दुष्काळाच्या सावटात बळीराजाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही मदतीचा हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे हा संकल्प आम्ही केलाय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेनेकडून राज्याभरात २५ हजार सायलकी, लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन, शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा, गरजू वस्तूंचे वाटप, सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाईल, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट जरी असले तरी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी व्यस्त दिनक्रमातही एक तास चर्चा केली. यात अर्धा तास पंतप्रधानांनी राज्यातील दुष्काळावर, लाडक्या बहिणींवर चर्चा झाली. यावर पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट मोठं आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. बळीराजाला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. आताही सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याचे सर्व मंत्रिमंडळ बांधावर गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. त्यांना धीर देण्याचे काम केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. राजकारण न करता सगळ्यांनी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काम केलं पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.
राजकारणासाठी इतर व्यासपीठ आहेत पण या संकटकाळात शिवसेना ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण करेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी या कसोटीच्या काळात हार मानू नये, खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, २०१४ नंतर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. नेशन फर्स्ट या हेतून मोदीजी काम करत आहे. मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री अशी सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष मोदीजी यांनी पूर्ण केली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी मोदीजी डगमगले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
----------



Comments
Post a Comment