केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महोत्सवाचे आयोजन
केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महोत्सवाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.०५(टिळक रत्न प्रतिनिधी) : दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील युवक कलावंतांनी आपल्या कलेतून वरुणराजाला पावसासाठी हाक तर दिलीच सोबत आपल्यात असलेली रगही पहिल्या दिवशी दाखवून दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने होत असलेल्या या महोत्सवात १०७ महाविद्यालयने सुमारे साडे सहाशे कलावंत सहभागी झाले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबर या काळात विद्यापीठ परिसरात सुरु आहे. प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (दि.पाच) करण्यात आले. मा. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा महोत्सव घेण्यात येत आहे. जिल्हास्तरीय युवक महोत्सव १ ते १२ सप्टेंबर या दरम्यान घेण्यात आले. या महोत्सवातील प्रत्येक कला प्रकारात विजेते तीन संघ केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी झाले आहेत. विद्यापीठ नाटयगृहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी (दि.पाच) सकाळी १० वाजता उद्घाटन झाले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी सिने अभिनेता तथा माजी विद्यार्थी कैलास वाघमारे, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता होके पाटील, कुलसचिव डॉ.संजय कवडे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दीप प्रज्वलन करुन महोत्सवाचे उद्घाटन केले. महोत्सव यंदाच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर घेण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. चार जिल्हयाचे महोत्सव, केंद्रीय व जानेवारीत होणारा लोककला महोत्सव असे एकूण सहा महोत्सव घेण्यात येणार असल्याचे डॉ.अंभुरे म्हणाले. प्रख्यात निवेदक डॉ प्रेषित रुद्रवार यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी आभार मानले.
*यजमान महाविद्यालयांचा गौरव*
जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल चारही संयोजक महाविद्यालयांचे प्राचार्य व सांस्कृतिक समन्वयक यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर - शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय - प्राचार्य डॉ.वैशाली देशमुख व प्रा.परमेश्वर पुरी, जालना - लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय व स्वामी विवेकानंद महाविद्यालय - प्राचार्य डॉ.भारत खंदारे व डॉ.सुधाकर जाधव तसेच बीड - पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय प्राचार्य डॉ.अनंत जाधव व डॉ.मुंजाभाऊ धोंडगे यांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय युवक महोत्सवात प्राविण्य मिळविलेल्या कलावंताचाही सत्कार करण्यात आला.
*हरलेल्या माणसाला घेऊन सिनेमा काढतो. - नागराज मंजुळे*
जिंकण असो की हारणं याला काही लॉजीक नसतं. मी तर अनेकदा हरलेल्या माणसांना घेऊनच सिनेमा काढतो. जीवनात पुढे जायचं असेल तर सतत ध्येयपथावरुन चालत राहणे महत्वाच असतं. चाललं की आपण पाहिजे त्या ठिकाणी नक्की पाहेचतो, असे प्रतिपादन प्राख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. माणसाला जन्मल्यापासून प्रत्येक ठिकाणी लढाईच करावी लागते. शाळा-महाविद्यालयाच्या बाहेरही शिकता आले पाहिजे. माझ्यासारखा कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या माणूस दिग्दर्शक होऊ शकतो. आपणही हा विचार करुन काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
*वेदनेला चिमटीत पकडणाराच खरा कलावंत - कैलास वाघमारे*
पायात रुतलेला काटा चिमटीत घेऊन काढल्यावर वेदना कमी होते. त्याप्रमाणे वेदना चिमटीत पकडणारच खरा कलावंत असतो, असे प्रतिपादन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, अभिनेता कैलास वाघमारे यांनी केले. आयुष्यात आलेली संधी दवडता कामा नये, कारण ’संधी पुढून शेंडी अन मागून होंडी असते’ जसे फडयाला चरगाठ बांधल्यावर मूठ भक्कम होते. तशीच कलेलाही चरगाठ बांधणारे लोक भेटल्यामुळे यशस्वी होत गेलो, असेही ते म्हणाले.
*दुष्काळ लढायला शिकवितो : कुलगुरू*
मराठवाड्यातील माणूस असे अनेक दुष्काळ पचवून मोठा झालेला आहे. अशा वेळी रडायचे नसते तर लढ्याचे असते, असं दुष्काळ आपल्याला शिकवीत असतो. त्यामुळे विद्यार्थी कलावंतानी आपल्या प्रतिभेचा आविष्कार दाखवावा, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. युवक महोत्सवात विद्यार्थिनींचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. साहित्य कला आणि विज्ञान क्षेत्रात संशोधनाला वाव मिळावा यासाठी विद्यापीठाने जिल्हावार अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन केले. नागराज मंजुळे, कैलास वाघमारे यांच्या सारखे आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतः तसे घडावे, असे आवाहनही डॉ फुलारी यांनी केल.


Comments
Post a Comment