परभणीत "महानिर्यात - इग्नाईट कन्व्हेंशन २०२६"

 परभणीत "महानिर्यात - इग्नाईट कन्व्हेंशन २०२६" एकदिवसीय कार्यशाळेचे १७ फेब्रुवारी रोजी आयोजन

निर्यात व उद्योग मार्गदर्शनासाठी विशेष मार्गदर्शन
उद्योजकांसाठी योजनांची माहिती एकाच ठिकाणी

परभणी, दि. १५ (टिळक रत्न प्रतिनिधी)-- उद्योजकांना सर्व योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी 'महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६' एकदिवसीय कार्यशाळा मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी  सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उद्योग केंद्रे, तसेच राज्य शासन व संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातविषयक कामकाज करणारे घटक, संशोधक व बँक प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यशाळेत पुणे येथील डीजीएफटीचे महासंचालक, अपेडा पुणे, एमएसएमईचे सहायक संचालक, मैत्री कक्षाचे अधिकारी, इंडियन पोस्टचे अधिकारी, अधीक्षकीय कृषी अधिकारी, SBI चे निर्यात वित्तपुरवठा व्यवस्थापक आदी तज्ज्ञांकडून निर्यात, उद्योगविकास व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.

राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम तसेच निर्यातवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत.

***

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज