नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
१ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम
स्वगणनेसाठी लिंक se.census.gov.inही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय आहे
परभणी, दि. १६ (टिळक रत्न प्रतिनिधी) -- भारत सरकारकडून देशाची १६ व्या जनगणनेच्या कामास सुरुवात झालेली असुन या जनगणनेमध्ये यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
स्व-गणनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
प्रारंभी दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.
*स्व-गणना म्हणजे काय ? -* आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर (https://se.census.gov.in) आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. स्व-गणना कालावधी हा दिनांक १ मे २०२६ ते दिनांक १५ मे २०२६ असा आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. सामान्य नागरिकांना स्व-गणना करुन जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणे शक्य होईल.
जनगणनेच्या कार्याकरीता परभणी जिल्हयातील ग्रामीण व नगरपरिषद शहरी क्षेत्रात एकुण 2 हजार 486 घरयादी गट बनविण्यात आले असुन एक घरयादी गट हा जवळपास 180-200 घरे किंवा 650 ते 800 लोकसंख्येपासुन तयार केला जातो. याकरिता एकुण 2 हजार 677 प्रगणक तसेच प्रत्येक 6 प्रगणकांकरिता 1 याप्रमाणे एकूण 454 पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक 27 एप्रिलपासून दिनांक 8 मे 2026 या कालावधीत चार्ज अधिकारी तथा तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या स्तरावर घेण्यात येणार आहे.
जे नागरिक तंत्रज्ञानाचा वापर करु शकत नाहीत, ज्येष्ठ नागरिक, किवा ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षित प्रगणक दिनांक 16 मे ते दिनांक 14 जुन 2026 या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन अॅपद्वारे माहिती नोंदवतील.
जनगणनेतून मिळालेली आकडेवारी पुढील 10 वर्षासाठी शाळा, दवाखाने, रस्ते, रेशन, पाणीपुरवठा, रोजगार योजना यांचे नियोजन ठरवते. तुमची एक अचूक नोंद म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाला हातभार आहे. तेव्हा 01 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या स्व-गणना टप्प्यात सहभागी व्हा. काही अडचण आल्यास आपले तालुक्यातील तहसिल कार्यालय तसेच नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
सर्वांनी जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवुन “जनगणनेतुन जनकल्याण” हे ब्रीद सार्थ ठरवु या व परभणी जिल्ह्याची जनगणना 100 टक्के यशस्वी करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment