परभणी : रमजानमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष? अन्न व औषधी विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
परभणी : रमजानमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष? अन्न व औषधी विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- परभणी शहरात पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांकडून दिवसभर रोजे (उपवास) ठेवले जात आहेत. सायंकाळी इफ्तारच्या वेळी विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसत आहे. शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्टॉलवर समोसे, भजी, पकोडे, चिकन पदार्थ तसेच इतर तळलेले मांसाहारी व शाकाहारी पदार्थ खुलेआम विकले जात आहेत.
मात्र या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तळणासाठी वापरले जाणारे तेल योग्य दर्जाचे आहे का? ते वारंवार वापरले जात आहे का? मांसाहारी पदार्थांची कोणत्याही प्रकारे तपासणी झाली आहे का? याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी उघड्यावर अन्न ठेवलेले दिसते, विक्रेते हातात हातमोजे तसेच डोक्यावर टोपी तोंडावर मास्क याचा वापर करताना दिसून येत नाहीत तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी किंवा कारवाई झाल्याचे कुठेही स्पष्टपणे दिसून येत नाही. रमजानसारख्या पवित्र महिन्यात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
शहरातील नागरिकांनी अन्न व औषधी प्रशासनाने तात्काळ तपासणी मोहीम राबवून निकृष्ट व अस्वच्छ पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रमजान महिन्यात श्रद्धेसोबतच आरोग्याचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.



Comments
Post a Comment