परभणी मनपा निवडणूक स्वबळाचा नारा थंड एकमेकांच्या साहाय्याने निवडणूक लढली जाणार

महायुती व महाविकास आघाडीतील सर्व मुख्य पक्ष व घटकपक्षासह स्थानिक पक्ष निवडणूक मध्ये सर्वच्या सर्व उमेदवार स्वबळावर उभे करण्यात अपयशी


परभणी,दि.18(टिळक रत्न प्रतिनिधी) : महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागातील सर्व 65 जागा स्वबळावर लढविण्याची ताकद प्रमुख राजकीय पक्षात, नेतृत्वात नाही, असे दुर्देवी चित्र समोर आले आहे.

              स्थापनेपासूनच महानगरपालिकेवर काँगे्रसचे वर्चस्व राहिले आहे. दोन निवडणूकीतून ते सिध्दही झाले. परंतु, आगामी निवडणूकीत काँग्रेस पुन्हा बाजी मारेल, हॅट्रीक करेल, असे चित्र नाही. त्याचे कारणही सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासारख्या भक्कम अशा नेतृत्वाचा काँग्रेस पक्षास सोडचिठी देऊन भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाचा निर्णय काँग्रेसजणांना निश्‍चितच तडाखा देणारा व भारतीय जनता पार्टीस उभारी देणारा ठरला आहे. त्यामुळेच काँग्रेसजणांसमोर सक्षम अशा नेतृत्वाचा व तगड्या उमेदवार निवडीचा यक्ष प्रश्‍न उभा राहीला आहे. ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख हे काँग्रेसचे सक्षम व सर्वार्थाने भक्कम असे नेतृत्व आहे. देशमुख यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली याच पालिकेवर वर्षानूवर्षे स्वतःचे निर्विवाद असे वर्चस्व राखले होते. परंतु, या निवडणूकीत ते स्वतः कितपत झोकून देऊन सर्व काँग्रेसजणांना उभारी देतील का? हा एक प्रश्‍न आहे. माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या नेतृत्वास निश्‍चितच मर्यादा आहेत. काँगे्रसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याही परभणी महानगरातील प्रभावाबद्दल प्रश्‍नचिन्हच आहेत. त्यामुळेच काँग्रेसजण सामुहीक नेतृत्वाखाली केवळ 50 टक्क्यापर्यंत जागा प्रभावीपणे लढवू शकतील, उर्वरित जागांकरीता उमेदवारांचा वाणवा भासेल, असे सकृतदर्शनी चित्र आहे.

             महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहरात निश्‍चितच प्रभाव आहे. परंतु, स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील व खासदार संजय जाधव या दोघातील पडद्याआडील वितुष्ट पक्षास नेहमीच तडाखा देणारे ठरले आहे. या निवडणूकीत हे दोघे कितपत एकदिलाने, प्रतिष्ठा पणास लावून लढतील, याविषयी या दोघांच्याही समर्थक इच्छुकांना पूर्वानुभवाच्या आधारे शंका-कुशंकाच आहेत. त्यामुळेच  शिवसेना उबाठा गट शंभर टक्के जागा स्वबळावर लढवू शकणार नाही, असे सकृतदर्शनी चित्र आहे.

             आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर आजतागायत  मोर्चेबांधणी संदर्भात फारशा गांभीर्याने हालचाली केल्या नाहीत. खासदार श्रीमती फौजिया खान, ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे हे दोघे ठरवतील ती पूर्व दिशा, हे नक्की. परंतु, पक्ष शंभरटक्के जागा लढवू शकणार नाही, हे तेवढेच स्पष्ट आहे.

             ज्येष्ठ नेते वरपुडकर यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील भाजपास निश्‍चितच बळ मिळाले आहे. केंद्र व राज्यातील सत्ता, त्या जोडीस जिल्ह्यातील पालकमंत्री पद हे या बळास पूरक ठरणारे आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर व ज्येष्ठ नेते वरपुडकर या त्रिकुटाद्वारे पक्ष या निवडणूका निश्‍चितच पहिल्यांदा गांभीर्याने लढवतील, हे स्पष्ट आहे. परंतु, 16 प्रभागातील धर्म आणि जाती-पातीची समिकरणे व पक्ष विस्तारातील मर्यादेमुळेच भाजप स्वबळावर 100 टक्के जागा लढवू शकणार नाही, हे ही तेवढेच स्पष्ट दिसत आहे.

              जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वावरच शिवसेना शिंदे गटाची पूर्णतः दारोमदार आहे. माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव, माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे, माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे किंवा अन्य स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी प्रभावहीन आहेत. त्यामुळेच भरोसे हे पक्षास कितपत भरोसा देऊ शकणार, हा प्रश्‍नच आहे. या स्थितीत पक्ष शंभर टक्के जागा लढवू शकणार नाही, हे ही वास्तव असे चित्र आहे.

              महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात कालपर्यंत मोठ्या प्रमाणावर अस्थिरता जाणवत होती, विशेषतः महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख हे स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत घडामोडींमुळे अस्वस्थ होते. परंतु, देशमुख यांना श्रेष्ठींनी सर्वाधिकार देऊन दिलासा दिला. त्यामुळे देशमुख यांनी या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा संकल्प सोडला. परंतु, पक्ष 16 प्रभागातील 65 जागा स्वबळावर लढवू शकणार नाही, हे ही सकृतदर्शनी स्पष्ट आहे.

या पार्श्‍वभूमीवर पक्षासह स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींच्या प्रभावाच्या मर्यादासुध्दा या निवडणूकीच्या निमित्ताने स्पष्ट होऊ लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज