देणाऱ्यांचे श्वास हजारो......दुबळी माझी झोळी..-डॉ गिरीश वेलणकर

जन्मभरीच्या श्वासाइतुके....
देणार्‍याचे श्वास हजारो, दुबळी माझी झोळी

निसर्गाने आम्हाला भरभरून दिले आहे, पण आम्ही करंटेपणे त्याचा नीट वापर करत नाही. याआधी आपण पाहिले की श्वास हा शरीर व मन यातला, ऐच्छिक व अनैच्छिक क्रियांमधला सेतू आहे. दैनंदिन व्यवहारात आपण पाहातो की आपण धावपळ केली की (जी आपण क्वचितच करतो) श्वासगती वाढते, आराम केला की कमी होते. राग आला की वाढते, मन शांत असले की कमी होते. 

सेतू शब्द फार अर्थपूर्ण आहे. सेतूवरून दोन्ही बाजूंनी ये जा करता येते. याचाच अर्थ असा की शरीर, मनाच्या व्यापारांनी जशी श्वासाची गती बदलते तशीच श्वासाच्या गतीवरील नियंत्रणातून शरीर, मनालाही नियंत्रित करता येते. सर्वसामान्यपणे श्वासाचे नियंत्रण आपल्याला नकळत लंबमज्जेकडून होत असते, पण जेव्हा आपण अभ्यासपूर्वक श्वासाला नियंत्रित करतो तेव्हा हे नियंत्रण लंबमज्जेकडून मेंदूकडे जाते. मेंदूकडून जेव्हा श्वासाची लयबद्धता नियंत्रित केल्या जाते तेव्हा शरिरातील अन्य क्रियांची लयबद्धताही नियंत्रित होते. यात ह्रदयाचे ठोके, स्नायूंचे आकुंचन प्रसरण, मानसिक व भावनात्मक आवर्तने, अंत:स्रावी ग्रंथी व अन्य स्राव यांचे नियंत्रण, निद्रा व जागृती यांची लयबद्धता अशा अनेक गोष्टी नियंत्रित होतात. (“The rhythms of breath relate to the brain rhythms, heartbeat, muscle tension, mental and emotional rhythms, hormonal and enzymatic rhythms, sleep and wakefulness, all with varying frequencies and intensities.” -Page 112, Pran and Pranayam by Sw. Niranjananand Saraswati)

एवढी प्रचंड क्षमता असणारा श्वास निसर्गाने आम्हाला बहाल केला आहे, तो ही एखाद दुसरा नाही, तर अपरिमीत व निरंतर. सर्वसामान्यपणे आपण एका मिनिटात 15-18 श्वास घेतो. एका श्वासात साधारणपणे अर्धा लिटर (Tidal volume) हवा आपण आत घेतो, त्यातील सुमारे 150 मि.लि. ही नाकापासून फुफ्फुसापर्यंत असलेल्या लहान मोठ्या श्वासनलिकांमध्ये असते. ही हवा प्रत्यक्ष श्वसन क्रियेत भाग घेत नाही (Dead space), म्हणजे 500 मि.लि. पैकी फक्त 350 मि.लि. हवा श्वसनासाठी उपलब्ध असते. हवेत प्राणवायुचे प्रमाण सुमारे 20% असते. म्हणजे 350 मि.लि. हवेतीलच प्राणवायू प्रत्यक्ष श्वसनासाठी उपलब्ध असतो.

जेव्हा शरिरातील प्राणवायुची मागणी वाढते, उदा. व्यायामाच्या वेळेस, तेव्हा आपण एका श्वासात 4.5 – 5 लिटर हवा आत घेतो (Vital capacity). म्हणजे निसर्गाने आम्हाला दिलेल्या क्षमतेच्या केवल 10% क्षमतेचा वापर आम्ही रोजच्या व्यवहारात करतो. म्हणून वर म्हटले आहे की, देणार्‍याचे श्वास हजारो, दुबळी माझी झोळी. एका श्वासात हवा आत घेण्याची आमची क्षमता (Tidal volume) कशी वाढते, तर श्वसनाचा वेग जितका संथ व लयबद्ध असेल त्या प्रमाणात ही क्षमता वाढते. तसेच वायुकोषात (Alveolus) हवेतील प्राणवायू केशवाहिन्यातील (capillary) रक्तात शोषल्या जाणे, व रक्तातील कर्बाम्लवायूचे हवेत निष्कासन होणे याचे प्रमाण श्वास-प्रश्वासामधल्या विराम काळावर अवलंबून असते व हा विरामकाळ श्वासाच्या गतीवर व लयीवर अवलंबून असतो.

तेव्हा आता सावकाश सखोल श्वास घ्यायचा निर्धार करा. एकवेळ पोटभर खायला मिळणार नाही, पोटभर आनंद उपभोगायला मिळणार नाही, पण पोट भरून हवा घेता येत नाही असे कोणी म्हणू शकत नाही. हा पोट भरून श्वास व पोट रिकामे करून प्रश्वास केवळ तुमच्या आरोग्याच्या मार्गावरचे पुढचे पाऊल ठरणार नाही, तर आज ज्या करोनामुळे सगळ्यांचा श्वास घशात अडकला आहे, त्यापासून बचावाचीही ती पहिली पायरी ठरेल. आता फक्त “मला श्वास घ्यायलाही फुरसत नाही” असे म्हणू नका. लेखन-डॉ. गिरीश वेलणकर,परभणी

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन